Maharashtra Rain : मान्सूनचे जवळपास अडीच महिने पूर्ण झाले आहेत आणि आता फक्त दीड महिन्यांचा काळ बाकी राहिला आहे. मान्सूनच्या या पहिल्या अडीच महिन्यात आपल्याला मान्सूनचे वेगवेगळे रंग पाहायला मिळालेत. यंदा मान्सून सुरुवातीला काहीसा कमजोर वाटत होता. मात्र जून महिना संपल्यानंतर मानसूनने आपले खरे रुद्र रूप दाखवले.
जुलै महिन्यात महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची मोठी तीव्रता पाहायला मिळाली. उत्तर महाराष्ट्रात देखील ठीक-ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान झाले.
जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर जुलै च्या शेवटी पावसाने थोडा काळ विश्रांती घेतली. यामुळे ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त होते तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा जास्त दिवस टिकू शकला नाही.
कारण की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने दणका दिला. पण, आता गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर फारच कमी झाला आहे.
तसेच 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मात्र नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अजूनही पावसाचे प्रमाण अधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
मात्र, 15 ऑगस्ट नंतर परिस्थिती बदलणार आहे. 16 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छ.सं.नगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा २२ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पण दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, जालना, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या १४ जिल्ह्यात फक्त मध्यम पावसाची शक्यता आहे.