१५ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी या संकटाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वैज्ञानिकांना केले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाला (आयएमडी) दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी एक विशेष टपाल तिकीट, नाणे व आयएमडी ‘व्हिजन-२०४७’ दस्तावेजांचे अनावरण करत मोदींनी देशाच्या प्रगतीमधील हवामान विभागाच्या योगदानाचे महत्त्व आधोरेखित केले.
दिल्लीतील भारत मंडपमध्ये आयोजित समारंभात मोदींनी हवामान विभागाच्या कामाचे कौतुक केले.आपण हवामान विभागाच्या स्थापनेचे १५० वे वर्ष साजरे करत आहोत.हा प्रवास फक्त हवामान विभागाचा नाही तर देशातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा देखील प्रवास आहे.
आयएमडीने फक्त कोट्यवधी भारतीयांची सेवा केली नाही, तर ते देशातील वैज्ञानिक प्रवासाचे प्रतीक देखील आहे. वैज्ञानिक संस्थांमधील संशोधन आणि नवोन्मेष हे नवीन भारताच्या प्रवृत्तीचा भाग आहेत.त्यामुळे गत १० वर्षांत हवामान विभागाच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व विस्तार झाल्याचे मोदी म्हणाले.हवमानासंबंधीच्या पूर्व इशाऱ्यांमुळे चक्रीवादळादरम्यान होणारी जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
हवामान विभाग कोणत्याही देशाच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेमध्ये सर्वात जास्त ताकद प्रदान करत असतो.नैसर्गिक संकटामुळे उद्भवणारी बिकट स्थिती कमी करण्यासाठी हवामान शास्त्राची माहिती अधिक सक्षम करण्याची आवश्यकता मोदींनी व्यक्त केली. १९९८ मध्ये गुजरातच्या कांडलातील चक्रीवादळ आणि १९९९ साली ओडिशातील सुपर चक्रीवादळामुळे हजारो लोकांचा जीव गेल्याच्या घटनांचा उल्लेख करत मोदींनी आता चांगल्या पूर्व इशाऱ्यामुळे अशी जीवितहानी कमी झाल्याचा दावा केला.
सोनमर्ग बोगद्याच्या कार्यक्रम आयोजनाबाबत देखील हवामान विभागाचा वातावरणासंबंधीचा सल्ला आपल्या कामी आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भूकंपाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित करण्याची अत्यंत गरज आहे.वैज्ञानिक व संशोधकांनी या दिशेने काम केले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.
सोबतच हवामानासंबंधी माहिती समजून घेण्यासंदर्भातील देशाचा समृद्ध इतिहास आधोरेखित करत त्यांनी प्राचीन शास्त्र व ग्रंथांचा हवाला दिला.देशाला हवामानाप्रति सजग स्मार्ट राष्ट्र बनवण्यासाठी सरकारने मिशन मौसम योजनेची सुरुवात केल्याचेही त्यांनी नमूद केले.तत्पूर्वी मोदींनी भारत मंडपमध्ये हवामान विभागाच्या यशावर आधारित प्रदर्शनाला देखील भेट दिली.
भारतीय क्षमतांचा जागतिक समुदायालाही फायदा
हवामानशास्त्र तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भारतीय आपत्ती व्यवस्थापन क्षमतांमध्ये व्यापक सुधारणा झाल्या आहेत.याचा फायदा फक्त देशालाच नाही तर जागतिक समुदायाला देखील होत आहे.आज भारताच्या पूर मार्गदर्शन प्रणालीकडून नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंकेसह शेजारी देशांना पुराबाबतची पूर्व माहिती दिली जाते.शेजारी देशांच्या कोणत्याही संकटात मदतीचा हात पुढे करणारा पहिला देश म्हणून भारत समोर आला असल्याचे मोदी म्हणाले.