कांदा पिकाला बसला गारपीट, अवकाळी पाऊस, धुके तसेच ढगाळ वातावरणाचा फटका

Ahmednagarlive24 office
Published:
Onion News

Onion News : गारपीट, अवकाळी पाऊस, धुके तसेच ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसला आहे, धुके व पाऊस, यापासून कांदा रोपे वाचविण्यासाठी मोठ्या फवारण्या कराव्या लागत असल्याने कांदा उत्पादकांचा खर्च वाढत आहे.

धुक्यामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक हतबल झाले आहेत.

यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. मात्र, मध्यंतरी झालेला बेमोसमी पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास निर्माण होणाऱ्या धुक्यामुळे कांदा पीक धोक्यात येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत तसेच उत्पादित मालाला जेमतेम भाव मिळत असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने त्वरीत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. सध्या काही कांद्याचे पीक एक महिन्याचे झाले असून, नवीन कांदालागवड सुरु आहे.

मात्र कांदा पिकासाठी पोषक थंडीचे वातावरण गायब होऊन अवकाळी पावसाने कांद्यास चांगलेच झोडपून काढले. पावसाच्या उघडीपीनंतर ढगाळ वातावरण व सकाळच्या धुक्याचा कांदा पिकावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसत आहे.

पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारावी लागत आहेत. परिणामी कांदा उत्पादन खर्चात भर पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

तर काही ठिकाणी ज्वारी, फळबागा व इतर पिकांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

अवकाळी पावसाने तूर, हरभरा पिके जरी जोमात दिसत असली तरी त्यावर मोठ्या प्रमाणात पाने कुरतडणाऱ्या अळ्या पडल्याने पिकाचे नुकसान होत आहे. अळीचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरण व ऊन नसल्याने तुरीची फुलगळ होत आहे. सध्या सर्वच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe