Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही भागांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक जिल्हे मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
अशातच, आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात पावसाचा जोर कधीपासून वाढणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 14 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे. 14 जुलै ते 20 जुलै या सात दिवसांच्या कालावधीत राज्यात चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खरे पाहता, राज्यात आजपासून 26 जुलै पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे.
मात्र जोरदार पाऊस हा 14 ते 20 जुलै दरम्यान बसणार आहे. या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागात दमदार पाऊस पडणार आहे. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
अगदी ओढे-नाले भरून वाहतील अशा स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे या काळात छोटे-मोठे तळे देखील फुल भरणार आहेत आणि मोठ्या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक वाढणार असा विश्वास पंजाबरावांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना पंजाब रावांनी दरवर्षी दहा ते पंधरा जुलै या कालावधीत राज्यात चांगला पाऊस पडत असल्याचे म्हटले आहे. यामुळे यंदाही या काळात चांगला पाऊस पडणार आहे. दरवर्षी दहा ते पंधरा जुलैच्या कालावधीत म्हणजे आषाढी वारीच्या काळात जोरदार पाऊस पडत असतो.
यंदाही आषाढी वारीच्या या काळात चांगला पाऊस पडणार आहे. यावर्षी संपूर्ण मान्सून काळात चांगला पाऊस राहील. पावसाचा खंड पडणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्त राहावे असे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावांनी म्हटले आहे.
दुसरीकडे हवामान खात्यातील काही तज्ञांनी सुद्धा 14 ते 18 जुलै या कालावधीत महाराष्ट्रात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या दमदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.