शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस, पंजाबरावांचा नवीन अंदाज पाहिलात का ?

Published on -

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमधील शेतकऱ्यांची निराशा केली होती. महाराष्ट्रात अक्षरशा दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही असा दावा अनेक संस्थांनी केला आहे. भारतीय हवामान खात्याने देखील यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थिती खूपच सकारात्मक राहणार असल्याचा अंदाज दिला आहे.

यंदा मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असे आयएमडीने म्हटले आहे. मात्र गेल्या महिन्यात म्हणजेच मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे.

जून महिन्यात राज्यात अक्षरशः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा लहरीपणा यंदाही शेतकऱ्यांचा मुळावर उठला असल्याचे दिसत आहे. तथापि जुलै महिन्याच्या सुरुवातीला भारतीय हवामान खात्याने राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात सरासरी हुन अधिक पाऊस पडणार असे सांगितले.

विशेष म्हणजे राज्यातील अन्य सहा जिल्ह्यांमध्येही जुलै महिन्यात सरासरी एवढा पाऊस होणारच असा अंदाज आयएमडीने जारी केला. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही राज्यात पाऊस झालेला नाही. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी 10 जुलैपर्यंत म्हणजेच आजपासून चार दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला आहे.

या कालावधीत राज्यातील सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. अगदी नदी नाले ओसंडून वाहतील असा पाऊस या कालावधीत पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या काळात राज्यातील काही छोटे-मोठे तळे सुद्धा भरू शकतात असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला आहे.

पंजाबराव म्हणतात की ज्यावर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्यावर्षी अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, मराठवाडा, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागात चांगला पाऊस पडत असतो.

सुदैवाने यंदा पूर्वेकडूनचं पाऊस आला आहे यामुळे यावर्षी मान्सून काळात चांगला पाऊस पडेल असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता पंजाबरावांचे हे भाकीत खरे ठरते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe