पंजाबराव म्हणतात अवकाळीचा मुक्काम लांबला; पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावसहित ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता !

Published on -

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सध्या स्थितीला अनेक भागातील शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी लगबग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आगामी खरीपसाठी पूर्वमशागतीची तयारी सुरू झाली असून शेतकरी बांधव बी-बियाण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत आणि भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. बँकेकडून पीक कर्ज घेण्यासाठी तथा इतर पर्यायी मार्गाने पैशांची जमवाजमव करण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांचे आगामी मान्सूनकडे देखील लक्ष लागून आहे. मौसमी पावसाला कधी सुरुवात होणार? मानसूनमध्ये कसा पाऊस बरसणार , पाऊसमान कसे राहणार ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. मात्र, असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय याचा आगामी मान्सूनवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांना आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सध्या सुरू असलेला वादळी पाऊस आणखी किती दिवस बरसणार या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

आणखी किती दिवस सुरू राहणार वादळी पावसाचे सत्र

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 12 मे ते 18 मे दरम्यान पावसाची शक्यता आहे. आधी पंजाबरावांनी 7 मे ते 11 मे या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज दिला होता. विशेष म्हणजे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. अशातच आता पंजाबरावांनी 18 मे पर्यंत राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज नुकताच वर्तवला आहे.

या कालावधीत राज्यातील खानदेश सहित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील या कालावधीमध्ये पाऊस पडणार मात्र विदर्भातील पावसाचा जोर हा काहीसा कमी राहील असा अंदाज यावेळी जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

या कालावधीमध्ये राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल असे पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.

या कालावधीत कोकणात देखील मोठा पाऊस पडू शकतो असे डख यांनी म्हटले आहे. मात्र हा वादळी पाऊस 18 मे नंतर कमी होत जाईल असा अंदाज आहे. यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यायची आहे.

या कालावधीत वादळी वारे आणि विजांचे प्रमाण अधिक राहणार आहे यामुळे आपल्या पशुधनाची देखील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे पंजाबरावांनी म्हटले आहे. तथापि सध्या सुरू असलेला हा पाऊस राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. या पावसामुळे उसाचे दोन-तीन पाणी वाचतील असे म्हटले जात आहे.

मान्सून बाबत पंजाबरावांचा अंदाज काय?

पंजाबरावांनी मान्सून बाबत नुकत्याच काही दिवसांपूर्वी अंदाज दिला आहे. यामध्ये त्यांनी 20 मे पर्यंत मान्सूनचे अंदमानात आगमन होईल असे म्हटले आहे. तसेच तेथून पुढील 20 दिवसात अर्थातच 9 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असे त्यांनी सांगितलय. तथापि यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या या जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील.

यंदा जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात जास्त पाऊस, ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर तथा ऑक्टोबर महिन्यात जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासकं पंजाबरावांनी दिला आहे. एवढेच नाही तर यंदा पाच नोव्हेंबरला मान्सून माघारी परतणार असेही त्यांनी सांगितले आहे. यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होईल असे त्यांनी सांगितले असून यामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार अशी अशा व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe