अहमदनगर जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ! दिवसा ऊन पहाटे व रात्री थंडी….

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सोसावा लागला; परंतु गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाल्याने गुलाबी थंडीची चालूल लागली आहे.

रात्रीच्या तापमानात घट झाल्याने पहाटे अल्हाददायक थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. दिवसा ऊन पहाटे व रात्री थंडी असे संमिश्र वातावरण तयार झाले आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने थंडीचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता आहे. या विचित्र हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर जाणवत असून, रुग्णसंख्येत वृद्धी होत आहे. दुसरीकडे थंडीची चाहूल लागल्याने अनेकांनी व्यायामावर भर दिल्याचे दिसत आहे.

यंदा सरासरी पूर्ण न करता मान्सूनने निरोप घेतला. मान्सून जाताच ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असतानाच अचानक वातावरणात बदल झाला व नागरिकांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळाला.

तापमानात घट होऊ लागल्याने थंडी सुरु झाली आहे. तिन्ही ऋतुंमध्ये सर्वात आल्हाददायक व सर्वांना हवाहवासा ऋतू म्हणजे हिवाळा. साधारणपणे दिवाळीनंतर थंडीस सुरुवात होते, डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढू लागतो.

मात्र, यंदा ऑक्टोबर च्या शेवटापासूनच थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये उन्हाळ्याचा अनुभव नागरिकांना येत होता. परंतु अचानक तापमान घटल्याने चांगलीच थंडी जाणवू लागली आहे.

घराघरांतील नागरिकांनी त्यांचे उबदार कपडे बाहेर काढल्याचे दिसत आहे. उबदार कपड्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. सकाळच्या सुमारास काही भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात धुकेही दाटत आहे. सध्या कडाक्याची नसली तरी ही सगळीकडे थंडी पडू लागली असल्याने थंडीमध्ये होणारे त्रासही हळूहळू डोके वर काढू लागले आहेत.

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मेडिकलसह खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण वाढत आहे, यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. थंडीमुळे आरोग्याची उपासना करणाऱ्या नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News