Summer Vacation Spots | उन्हाळ्यातील उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि कुटुंबासोबत शांततेचा वेळ घालवण्यासाठी भारतात अनेक थंड, निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाणं उपलब्ध आहेत. देशातील काही भागांमध्ये तापमान 45 ते 50 अंशांपर्यंत पोहोचतं, अशा वेळी थंड आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळं खूपच लोकप्रिय ठरतात. या लेखात अशाच काही सुंदर ठिकाणांची माहिती देत आहोत जिथे तुम्ही कुटुंबासोबत शांत वेळ घालवू शकता आणि उन्हाळ्यातील सुट्ट्यांचा भरपूर आनंद घेऊ शकता.
काश्मीर
उन्हाळ्यात फिरण्यासाठी सर्वाधिक पसंती मिळवणारं ठिकाण म्हणजे काश्मीर. हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित डोंगर, फुलांचे बाग, आणि शांत तलाव यामुळे काश्मीर हे उन्हाळ्यातही थंड हवामान असलेलं ठिकाण ठरतं. एप्रिल ते जून या महिन्यांत येथे पर्यटकांची विशेष गर्दी असते.

कूर्ग
कर्नाटक राज्यातील कूर्ग हे देखील उन्हाळ्यात फिरण्यासाठी अतिशय चांगलं ठिकाण आहे. येथे डोंगराळ प्रदेश, धबधबे, आणि कॉफीच्या मळ्यांमधून फिरण्याचा अनुभव तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जातो. उन्हाळ्याच्या उकाड्यातही इथलं हवामान आल्हाददायक राहतं.
पचमढी
मध्य प्रदेशातील पचमढी हे राज्यातील एकमेव हिल स्टेशन आहे. हे ठिकाण त्याच्या शांत आणि सुंदर निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातं. उन्हाळ्याच्या हंगामात इथलं हवामान फारच सुखद आणि थंड असतं. पचमढीमध्ये धबधबे, गुहा आणि घनदाट जंगले पाहण्यासारखी आहेत.
मेघालय
पूर्व भारतातील मेघालय हे राज्य ढगांचे घर म्हणून ओळखले जाते. इथे असणारे उंच पर्वत, हिरवीगार खोरं आणि धबधब्यांनी नटलेलं निसर्गदृश्य मनाला मोहून टाकतं. चेरापुंजी , शिलाँग , दावकी ही काही ठिकाणं पर्यटकांसाठी खूप आकर्षक ठरतात.
मुनस्यारी
उत्तराखंडमधील मुनस्यारी हे ठिकाण अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही. शांतता, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि हिरव्यागार जंगलं यामुळे हे ठिकाण उन्हाळ्यात सुद्धा थंडगार राहतं. ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम पर्याय आहे.