Climate Change : हवामान बदलामुळे स्थानिक पातळीवर तीव्र पावसाच्या घटना भविष्यात वाढण्याची शक्यता आहे, आणि म्हणून, आणखी अचानक पूर येण्याची अपेक्षा आहे. तापमानवाढीच्या वातावरणात,
चक्रीवादळांची वारंवारता वाढेल आणि किनारपट्टी आणि जवळपासच्या अंतर्देशीय भागात तीव्र पाऊस आणि पुराच्या अधिक घटनांना सामोरे जावे लागेल. सध्या पूरप्रवण नसलेल्या भागात पूर येण्याची शक्यता आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी- रुरकी येथील संशोधकांनी व्यक्त केली आहे.
देशातील आधीच्या पुराच्या घडलेल्या घटनांचा अभ्यास या संशोधकांनी केला आहे. त्यानुसार बाधित लोकांची संख्या, पुराचा प्रसार आणि कालावधी यावर आधारित पुराची ऐतिहासिक तीव्रता लक्षात घेऊन संशोधकांनी विकसित केलेल्या जिल्हास्तरीय पूर तीव्रता निर्देशांकामध्ये ही बाब दिसून आली आहे.
या निर्देशांकानुसार पाटणा शहराने सर्वात भीषण पुराचा अनुभव घेतलेला असून, त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि महाराष्ट्रातील ठाणे यांचा क्रमांक असल्याचे दिसून आले आहे. नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती शहरांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
उत्तराखंडमधील चामोलीला वारंवार येणाऱ्या पुराचा सामना करावा लागत नाही. पण तरी काही वेगळ्या अत्यंत हानीकारक पूर घटनांमुळे चामोलीचा या यादीत समावेश आहे. पुराचा सर्वाधिक धोका असलेल्या ३० जिल्ह्यांपैकी १७ जिल्हे गंगा खोऱ्यात आणि तीन ब्रह्मपुत्रा खोऱ्यात आहेत.
देशातील सर्व नदी खोऱ्यांपैकी, गंगा खोऱ्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि तिची पूरप्रवणता चिंताजनक आहे, असे आयआयटी-दिल्लीचे सहाय्यक प्राध्यापक मानवेंद्र सहारिया यांनी सांगितले. देशात सर्वाधिक पूर येण्याचे प्रमाण आसाममध्ये असून,
गेल्या ५६ वर्षांत या राज्याला ८०० पेक्षा जास्त पूरस्थितींना तोंड द्यावे लागल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. इतर पूरप्रवण राज्यांमध्ये, पूर घटनांच्या उतरत्या क्रमाने, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.