Ahmednagar News : शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंद्यांपैकी एक असलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता वाढते ऊन, पाणी टंचाई व महागाईमुळे संकटात सापडला आहे. सध्या तापमानाची तीव्रता वाढत आहे. ब्रॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
महिनाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन सुरू असल्याने अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. श्रीरामपूर तालुक्यासह राहुरी भागातील बहुतेक शेड आता रिकामे राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोदावरी व प्रवरा नदी पट्ट्यात कुक्कुटपालन व्यवसाय शेकडो शेतकऱ्यांचा प्रमुख शेतीपूरक व्यवसाय बनला आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांनी मोठी प्रगती साधली आहे; परंतु सध्या दुष्काळाच्या झळा वाढल्याने कोंबड्यांना हे वातावरण मानवत नाही.
त्यातच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड बनले आहे. कोंबड्यांना पाणी बदल करावे लागत नाही. तसे केले तर सर्दीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
त्यामुळे कोंबड्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी एकाच जागेवरचे लागते. मात्र सध्या विहिरीसह कुपनलिकांचे (बोअरवेल) पाणी कमी झाल्याने पोल्ट्री व्यवसाय करणे अवघड बनल्याचे युवा शेतकरी राहुल हारदे यांनी सांगितले.
चिकन गरम व प्रोटीनयुक्त असल्याने हिवाळ्यात हा व्यवसाय तेजीत असतो. परंतु, उन्हाळ्यात मागणी कमी असते. बोकडाच्या मटणाचे भाव वाढलेले असल्याने अनेकजण ब्रॉयलर कोंबडीवर समाधान मानतात. त्यामुळे सध्या कोंबडीला मागणी आहे. परंतू उन्हाळ्याच्या गरम वातावरणात कोंबड्या जगवणे तारेवरची कसरत बनली आहे.
व्यावसायाच्या खर्चात वाढ
गेल्या वर्षभरात मक्याचे भाव वाढल्याने कोंबडी खाद्यही महागले आहे. त्यामुळे खर्चात प्रतिकिलो ५ ते ७ रुपयांनी वाढ झाली आहे. पक्ष्यांचे भाव देखील वाढले आहे. वाढत्या उष्णतामुळे पक्ष्यांचे वजन न वाढणे, उन्हाळ्यातील तिव्र पाणी टंचाई, मजुरांची टंचाई, गव्हाच्या भुशाची अनुपल्बधता, यामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. परिणामी, अनेक व्यावसायिकांचे शेड उन्हाळ्यात रिकामे पडतात.
यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाच्या झळा पोल्ट्री व्यवसायालाही बसत आहे. वाढती उष्णता व पाणीटंचाईमुळे कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड बनले आहे. गव्हाचा भुसा मिळत नसल्याने महाग मिळणारे तांदळाचे तूस वापरावे लागते. उष्णतेमुळे पक्षांचे वजन वाढत नाही. तसेच सर्दी, फ्ल्यू यासारखे संसर्गजन्य आजार होतात. त्यामुळे उन्हाळ्यात व्यावसायिक पिले टाकण्यास धजावत नाहीत. – सचिन हारदे, पोल्ट्री व्यावसायिक, तहाराबाद
असा येतो खर्च
तांदूळ तूस ८ ते ९ रुपये किलो
खाद्य ३५ ते ४५ रुपये किलो
मजुरी ४०० रुपये (दररोज)
पक्षी ४० ते ४२ रुपये
पाण्याचा टँकर ८०० ते १ हजार