पुणेकरांनो सावधान! तापमानाने गाठला ४२ अंशाचा टप्पा, पुढील २ दिवस राहणार धोक्याचे

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून लोहगावमध्ये ४२.२ अंश नोंदले गेले. उष्माघाताचा धोका वाढल्यामुळे आयएमडीने नागरिकांना सावध राहण्याचे आणि दुपारी घराबाहेर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

Published on -

पुणे- यंदा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पुण्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागला आहे. अंगाची लाही लाही करणारा उकाडा आणि तीव्र झळांनी पुणेकरांची दैना उडाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी शहर आणि उपनगरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना टोपी, स्कार्फ आणि गॉगल्स यांचा वापर करणे गरजेचे झाले आहे.

लोहगाव येथे बुधवारी दिवसभरात ४२.२ अंश सेल्सिअस, तर शिवाजीनगरमध्ये ४०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुढील दोन दिवस उन्हाची ही तीव्रता कायम राहणार असल्याचे सांगितले असून, दुपारच्या वेळी बाहेर न फिरण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

सर्वाधिक तापमानाची नोंद

सोमवारी पुण्यात या हंगामातील सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. रात्रीही उकाडा वाढल्याने नागरिकांची झोपमोड झाली आहे. मंगळवारी आणि बुधवारीही उन्हाचा तडाखा कायम राहिला. दुपारी बारा नंतर तर सूर्याच्या झळा असह्य होत होत्या. या उष्णतेमुळे नागरिकांना घामाघूम होत असून, दैनंदिन कामे करणेही कठीण झाले आहे. हवामान खात्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे, कारण उष्णतेचा हा प्रभाव आणखी काही काळ टिकणार आहे.

हवामान विभागाचा सल्ला

उष्णतेमुळे डिहायड्रेशन, उष्माघात, घामोळे आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ताप, घाम न येणे, उलट्या, थकवा किंवा चक्कर यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हात बाहेर पडताना टोपी, छत्री आणि सनस्क्रिनचा वापर करावा, तसेच लिंबूपाणी, नारळपाणी आणि ताक यांसारख्या घरगुती पेयांचा समावेश आहारात करावा. रात्री पुरेशी झोप घेण्याकडेही विशेष लक्ष द्यावे, असे हवामान विभागाने सुचवले आहे.

पुढील दोन दिवस राहणार तिव्रता

या उष्णतेने पुणेकरांचे जनजीवन विस्कटले असून, विशेषतः दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. पुढील दोन दिवस तरी ही परिस्थिती कायम राहणार असल्याने नागरिकांना सावध राहून स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. उष्णतेचा हा तडाखा कमी होण्यासाठी पावसाची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागली आहे. तोपर्यंत सावधगिरी आणि योग्य काळजी घेणे हाच पर्याय पुणेकरांसमोर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News