Maharashtra Weather News : राज्यात उन्हाच्या तडाख्याबरोबर आता गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून,
विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पूर्व विदर्भापासून कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी, पावसाला पोषक वातावरण झाले असून, राज्यात सध्या ढगाळ आकाश होत आहे. त्याचबरोबर उन्हाच्या झळा, उकाडा कायम आहे.
राज्यात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. शनिवारी (६ एप्रिल) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १९.५ अंश सेल्सिअस इतके होते.
शनिवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही भागांत किंचित वाढ, तर काही भागांत ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. ७ ते १० एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी यलो व ऑरेंज अलर्ट असून मेघगर्जना,
विजांच्या कडकडाटयंसह पाऊस व सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर, मराठवाड्यात गारपीट होणार आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट असून मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पाऊस व सोसाट्याचा वारा व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.