श्रीगोंद्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका; लाखो रुपयांचे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील घोड पट्टयातील काही भागात वादळी वारा व अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळ आणि गारपिटीमुळे चारापिके आणि विशेषतः फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी झाडे, महावितरणचे खांब उन्मळून पडले आहे. दरम्यान, प्रशासन मतदान प्रक्रियेत अडकल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत.

तालुक्यातील वांगदरी, लिपणगाव, शिरसगाव बोडखा, हंगेवाडी आदी भागात सोमवारी (दि.१३) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. जोरदार वाऱ्यासह अचानक झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वांगदरी येथे मिलिंद नागवडे यांच्या ‘पॉलीहाऊस’चा कागद फाटून पिकांचे नुकसान झाले. मारुती निवृत्ती टुले यांच्या घराचे पत्रे उडाले.

रविंद्र नागवडे यांच्या कुक्कुटपालन शेडवर झाड पडल्याने काही कोंबड्या मृत पावल्या. त्याचबरोबर वाऱ्यामुळे महावितरणचे अनेक खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचबरोबर वाऱ्यामुळे बहुतांश पिके जमीनदोस्त झाली आहेत. हंगेवाडी, शिरसगाव बोडखा, भागात झालेल्या गारपिटीमुळे डाळिंब, लिंबू फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, प्रशासन निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली.अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत नगरमध्ये असल्याने उद्या (दि.१५) पंचनामे करणार आहोत. – डॉ. क्षितिजा वाघमारे, तहसीलदार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe