राज्याच्या काही भागांत थंडीचा कडाका वाढला असून, मंगळवारी राज्यात किमान तापमान विदर्भातील गोंदियामध्ये ९ अंश सेल्सियस इतके नोंदवले आहे. दरम्यान, राज्यात थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वाऱ्यांचा वेग वाढत आहे. त्यामुळे थंडीतही वाढ होत आहे. विदर्भातील अनेक भागांचे किमान तापमान वेगाने घटत आहे. त्याचबरोबर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे.
राज्यात सध्या हवामान कोरडे आहे. त्यामुळे थंडीत आणखी वाढ होणार आहे. सोमवारी गोंदियाचे तापमान १२.५ अंश सेल्सियस इतके होते. त्यात मंगळवारी झपाट्याने घट होत ते ९ अंश सेल्सियसवर आले आहे. दरम्यान, राज्यात कमाल तापमान अलिबागमध्ये ३४.५ अंश सेल्सियस इतके होते.
मंगळवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे १५.२ अंश सेल्सियस इतके किमान तापमान होते. तर, अहमदनगर १६.३, कोल्हापूर १४.४, महाबळेश्वर १२.६, मालेगाव १४.६, नाशिक १४, सांगली १८.९, सातारा १६.५, सोलापूर येथे १८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
कोकण भागातील मुंबई येथे २४.४, सांताक्रुझ २३.७, अलिबाग २०, रत्नागिरी २४.९ व डहाणू येथे २०.९ अंश सेल्सियस तापमान होते. मराठवाड्यातील धाराशिव येथे १६.६, छत्रपती संभाजीनगर १५.९, परभणी १३.५, नांदेड १६.२ तर बीड येथे १४.५ अंश सेल्सियसवर थंडीचा पारा होता.
विदर्भातील अकोला येथे १३.५, अमरावती १२.५, बुलढाणा १२.८, ब्रह्मपुरी ११.४, चंद्रपूर ११, गोंदिया ९, नागपूर ९.४, वर्धा ११.४, वाशीम १०, वर्धा ११.४, तर यवतमाळ येथे ९ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले आहे.