Tisgaon News : कल्याण विशाखापट्टण, हैदराबाद शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, पुणे या राष्ट्रीय महामार्गासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणाऱ्या तिसगाव येथे प्रवाशांसाठी प्रवासी शेड नसल्याने रखरखत्या उन्हात बसची वाट पाहत रस्त्यावर थांबण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी नगर रस्त्यावरील तिसगाव हे बाजारपेठेचे मोठे केंद्र असून परिसरातील २५ गावांचा दैनंदिन संबंध येथे येतो. पाचशेहून अधिक एसटी बसेस येथून पुण्यामुंबईकडे व मराठवाड्याकडे ये जा करतात. सुमारे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे काम व रुंदीकरणाचे काम पूर्ण होऊन येथील ५० वर्षांपूर्वीची बसचे शेड पाडण्यात आले.

लोकप्रतिनिधी, एसटीचे अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतचे या विषयाकडे फारसे गांभीर्याने लक्ष नसल्याने अहोरात्र वाहनांची वर्दळ असलेल्या तिसगाव बस थांब्यावर प्रवाशांना ऊन वारा पाऊस या सर्वांशी सामना करत बसची प्रतीक्षा करावी लागते. काही वेळा बस अधिकृत थांब्याच्या मागे किंवा पुढे थांबतात अशावेळी प्रवाशांना बस मागे धावावे लागते.
शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पुण्यामुंबईकडे होणारी सर्व वाहतूक याच रस्त्याने होते. येथील अतिक्रमणांचा विषय राष्ट्रीय महामार्ग विभागाने शेवटच्या टप्प्यात गांभीर्याने हाताळला, मात्र नगर वरून शेवगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोपऱ्यात छोटीशी सहजपणे न दिसणारी एक शेड घाई गडबडीत उभारण्यात आली. सूर्याच्या दिशेचा अभ्यास न करता शेड उभारली गेल्याने सकाळी नऊ पासून दुपारी चार वाजेपर्यंत येथे ऊन असते. परिसरातील हॉटेल व्यावसायिक, रस्त्याच्याकडेची झाडे अन्य व्यावसायिक, व्यावसायिकांची दुकाने, याच्या आडोशाला थांबत प्रवासी बसची वाट बघतात.
काही प्रवाशांना जाण्याची घाई असल्याने इतरत्र कुठेही न बसता ते रखरखत्या उन्हातच रस्त्याच्या कडेला जेथे बस थांबते तेथे उभे राहतात. तेथे कसलेही मूलभूत सुविधा नाहीत. बऱ्याच वर्षांपासून मिरी रस्त्याला तिसगाव बस स्थानकाचे काम होणार अशी चर्चा सुरू आहे, मात्र गाव एकीकडे व बस स्थानक दुसरीकडे अशी तक्रार करत ग्रामस्थांनी नव्या स्थानकाबद्दल नाराजी व्यक्त केली.
वृद्धेश्वर हायस्कूल चौकातच आता दुसरा बस थांबा आहे. तेथेही प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नाही. तिथे हातगाड्या आडव्या लावून प्रवाशांची गैरसोय केली जात आहे. तालुक्याची मागणी करणारे गाव बसशेड पासून वंचित आहे. स्वच्छतागृहाची कोठेही सोय नसल्याने मोकळ्या जागेचा वापर प्रवाशांकडून स्वच्छतागृहासारखा होतो. यामध्ये महिला प्रवाशांची मोठी कुचंबना होते.
मढी, मायंबा, वृद्धेश्वर, हनुमान टाकळी अशी तीर्थक्षेत्रे या परिसरात असल्याने राज्यातील विविध भागातील भाविकांची गर्दी दररोज येथे असते. पाथर्डी शेवगावकडून नगरकडे जाणाऱ्या प्रवाशांना निवारण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. सध्या लग्नसराई व शाळांच्या सुद्यांचा हंगाम आहे.
तिसगाव बस थांब्यावर पहाटेपासूनच प्रवाशांची गर्दी सुरू होते. रस्ता चांगला असल्याने खाजगी वाहने भरधाव वेगाने इतरत्र जातात. त्यामुळे रस्त्याच्याकडेला उभे राहिलेल्या प्रवाशांच्या जीवाला सुद्धा मोठा धोका होऊ शकतो.
यापूर्वी लहान-मोठे अपघात रस्त्याच्याकडेला उभे राहिलेल्या प्रवाशांना बाबतीत घडले आहेत. तिसगाव येथे शैक्षणिक संकुल मोठे असल्याने दोन्ही बस थांब्यांवर विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी वर्दळ असते. राज्य परिवहन मंडळांनी तातडीने निवारा बस शेड उभारून फिरते स्वच्छतागृह तेथे मांडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक गारुडकर, सतीश साळवे, सचिन खंडागळे यांनी केली आहे.