थांबा.! उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जाताय? तर मग ही बातमी अगोदर वाचा, आम्ही सांगतोय ते फाॅलो करा

Published on -

महाराष्ट्रात तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून 40 अंशाच्या पुढे गेलाय. उन्हाने नको-नको करुन ठेवलंय. त्यातच आता परीक्षा संपून अनेकांना सुट्याही लागल्यात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीचा प्लॅन अनेकदा समुद्रकिनारी जाऊन एन्जाॅय केला जातोय. फिरण्यासाठी काही जण उंच डोंगर, थंड हवेची ठिकाणं निवडतात तर काहींना निळाशार समुद्र किनारा भुरळ घालतो. यंदा जर तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत.

सनस्क्रिन सोबत ठेवा

समुद्रकिनारी सुटीचा प्लॅन केला असेल तर जाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे सनस्क्रिन. कारण जर तुम्ही सनस्क्रिनशिवाय समुद्र किनारी फिरण्यास गेला तर तुमची स्कीन चांगलीच टॅन होते. विशेष म्हणजे हे सनटॅन निघण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे समुद्रकिनारी फिरताना चांगले एसपीएफ असलेले सनस्क्रिन सतत जवळ बाळगा आणि त्याचा योग्य वेळी वापर करा.

डिहायड्रेटपासून स्वतःला वाचवा

समुद्रकिनारी सकाळी अथवा संध्याकाळी फिरताना तुम्हाला जास्त त्रास होत नाही. मात्र दिवसभर तुम्ही बीचजवळ असाल तर मात्र तुमचे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी अशा ठिकाणी फिरताना सतत पाणी, ज्युस, नारळपाणी प्या. ज्यामुळे तुमचे शरीर सतत हायड्रेट राहिल. समुद्रकिनारी जाताना डिहायड्रेशनची जास्त काळजी घेण्याचा सल्ला डाँक्टर्स देतात.

गॉगल, स्कार्फ आणि हॅट

समुद्रकिनारी जायचा प्लॅन केला तर अनेकांना कोकण भुरळ घालतो. सध्या कोकणात मोठ गर्दी जाणवत आहे. मात्र या ठिकाणी जाताना तुमच्या बॅगमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असायलाच हव्यात. जसं की स्कार्फ, टोपी अथवा हॅट आणि गॉगल शिवाय तुम्ही बीचवर फिरूच शकत नाही. कारण समुद्रकिनारी निसर्ग तुम्हाला आकर्षित करत असतो. मात्र त्याच निसर्गाचा एक भाग असलेल्या सूर्यप्रकाशात तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे टाळणाऱ्या वस्तू सोबत बाळगण्याचा सल्ला आम्ही देतो.

वॉटरप्रूफ बॅग आणि फूटवेअर

समुद्रकिनारी फिरताना तुमच्या हातातील वस्तू भिजू नयेत यासाठी एखादी वॉटरप्रूफ बॅग तुमच्या सामानात नक्की हवी. अशी बॅग तुमच्याकडे असेल तर, समुद्रकिनारी भिजल्यावर तुमचे ओले कपडे आणि ओल्या वस्तू तुम्हाला सहज त्यात ठेवता येतील. शिवाय समुद्रकिनारी फिरताना उंच टाचेच्या, लेदरच्या अथवा नाजूक फूटवेअर वापरणं टाळा. कारण त्यामुळे तुमचा प्रवासातील आनंद कमी होण्याची शक्यता आहे.

वॉटरप्रूफ कॅमेरा अथवा मोबाईल

समुद्र किनाऱ्यावरचा निसर्ग भान हरपून टाकतो. सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी एक मनमोहक नजारा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. पण हे सर्व क्षण टिपण्यासाठी तुमच्याजवळ जर वॉटरप्रूफ कॅमेरा अथवा मोबाईल असेल तर मजा दुपटीने वाढते. वॉटफप्रूफ गॅजेट्स असतील तर तुम्ही समुद्राच्या लाटेवर स्वार होत हे क्षण वेचू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!