राज्यातील हवामानात झालेला बदल आणखी काही दिवस कायम राहणार आहे. पुढील चार ते पाच दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लागत असली तरी कमाल तापमानाचा कहर अद्याप कायम आहे. बुधवारी राज्यातील तापमान अहिल्यानगर: ३७ अंश, बीड: ३९.८ अंश, मालेगाव: ३८.४ अंश, मुंबई: ३६.९ अंश, नाशिक: ३७.३ अंश, सोलापूर: ३८ अंश असे होते.

मुंबईत गुरुवारी आकाश ढगाळ राहील, तसेच हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली असून गारपटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला.
दुपारी ४ वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दिंडोरी तालुक्यात गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने विदर्भातील काही भागांत पुढील २४ तासांत वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचा इशारा दिला आहे.
पश्चिम बंगाल, हिमालय क्षेत्र ते मध्य प्रदेशपर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे.
बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वाहणारे वारे यांचा संगम झाला आहे. महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने शेतकऱ्यांना शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. अवकाळी पावसाचा परिणाम पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे.