नेवासा – चांगल्या पावसाच्या भरवशावर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या खरीप पेरण्या पाटपाणी वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाया गेल्या.त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गडाख यांनी म्हटले आहे, की चांगल्या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, कपाशी आदी खरीप पिकांची पेरणी केली. मुळा व भंडारदरा ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पाटपाणी मिळून पिके जगण्याची आशा होती.

त्याचवेळी तालुक्यात पाऊसच झाला नाही. शेतकऱ्यांच्या मागणीवरून दोन्हीही धरणांतून एक महिन्यापूर्वी आवर्तन सोडण्यात आले. यातून श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील साठवण बंधारे व तलाव भरून शेतीलाही मुबलक पाणी देण्यात आले; मात्र या दोन्ही धरणांच्या आवर्तनातून नेवासा तालुका अद्यापही वंचित आहे.
त्यामुळे पिके जळून गेली आहेत. ‘टेल टू हेड’ हा नियम अत्यंत तकलादू आणि नेवासा तालुक्याची क्रूर चेष्टा करणारा ठरला आहे. ‘मुळा’ व ‘भंडारदरा’च्या आवर्तनांना वेगवेगळा न्याय दिला जात आहे. आवर्तन काळात मुळा धरण्याच्या हेडला असलेल्या राहुरी तालुक्यातील बंधारे, तलाव भरून शेतीलाही पाणी देण्याचा प्रकार होत आहे.
शेतकऱ्याच्या कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यांना आधार देण्याची जबाबदारी शासनाची असून पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! ‘हे’ शेतकरी राहणार कर्जमाफी पासून वंचित
- आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू
- फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठा निर्णय ! Home Loan आणखी स्वस्त होणार
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! उन्हाळी हंगामासाठी 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे
- जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका किती वाढणार ? समोर आली आकडेवारी













