माजीमंत्री पाचपुतेंच्या कारखान्या विरोधात शेतकर्‍यांचे उपोषण

श्रीगोंदा – तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मधील ऊस बिल एफआरपी प्रमाणे न दिल्याच्या निषेधार्थ आलेश्वर (ता.परांडा) येथील शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी हे साखर आयुक्तालय,पुणे येथे अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन साखर आयुक्तांना शेतकर्‍यांनी दिले आहे.

परांडा तालुक्यातील आलेश्वर, बंगाळवाडी, गोसावीवाडी डोंजा येथील शेतकर्‍यांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात या परिसरातून 6 हजार मे.टन ऊस गाळपास दिला आहे. ऊस देऊन 9 महिन्याचा कालावधी झाला आहे.

त्यापैकी त्यांनी एफआरपी रक्कमेच्या 45 टक्के रक्कम शेतकर्‍यांना दिली आहे. अजून एफआरपीच्या 55 टक्के रक्कम साईकृपा साखर कारखान्याकडे बाकी आहे. शासनाच्या नियमानुसार बिल देण्याची वेळ निघून गेली आहे.

यापूर्वी बिले मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी अर्ज केले होते. असे असतानाही बिलाचा विचार झाला नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आहे.

शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. साईकृपा साखर कारखान्याने शेतकर्‍यांच्या बिलाचा विचार न केल्यास साखर आयुक्त,पुणे कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, सहकारमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी पुणे, साईकृपा साखर कारखाना  हिरडगाव (ता.श्रीगोंदा) चेअरमन आदींनी दिल्या आहे.