रामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील टेलटँकमध्ये पोहायला शिकत असताना २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान घडली.
याबाबत माहिती अशी, गुजरवाडी रस्ता म्हसोबा मंदिर परिसरात रहात असलेले संदीप बच्चूभाऊ चितळकर यांच्याकडे गडी म्हणून काम करीत असलेला योगेश बारसे (वय २२, रा. अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक) हा तरुण सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान टाकळीभान टेलटँकमध्ये पोहणे शिकण्यासाठी गेला होता.

पाठीवर ड्रम बांधून तो पोहणे शिकत होता. टेलटँकच्या पाणी सोडण्याच्या गेट जवळ तो पोहत असताना त्याने पाठीवर बांधलेला ड्रम निघून गेला व हा तरुण पाण्यात बुडाला. यावेळी चितळकरही या ठिकाणी पोहण्यासाठी आलेले होते. ते पोहणे झाल्यावर टेलटँकच्या भिंतीवर येवून थांबले.
यावेळी योगेश हा पोहत होता. मात्र चितळकर कपडे घालण्याच्या दरम्यान योगेशने पोहण्यासाठी पाठीवर बांधलेला ड्रम निघाला व योगेश पाण्यात बुडाला. कपडे घालून झाल्यावर चितळकर यांनी पाहिले असता या ठिकाणी योगेश दिसून आला नाही व त्याने बांधलेला ड्रम वाहत असलेला दिसून आला.
चितळकर यांनी सर्वत्र योगेशचा शोध घेतला. मात्र तो दिसून आला नाही. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.













