दर्शन व्यवस्था बंद ; श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्राैत्सव पौष पौर्णिमेला २८ ते ३० जानेवारी दरम्यान येत आहे.

या काळात भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन देवस्थान समिती व मानकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, यात्रा उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मानाच्या काठ्या व पालख्या प्रतिकात्मकरित्या मर्यादित स्वरूपात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रशासकीय नियम पाळून खंडोबा दर्शनासाठी येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, भालचंद्र दिवटे, मोहन रोकडे यांच्यासह अधिकारी, मानकरी उपस्थित होते.

मानाच्या काठी व पालखी सोबत प्रत्येकी दहा भाविकांना परवानगी दिली जाणार असून या भाविकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून परवाने दिले जातील.

यात्रा काळात कोरठण गडावर येणारे सर्व रस्ते दोन किमी. अंतरावर अडविण्यात येतील. त्यामुळे या काळात भाविकांनी येऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe