धक्कादायक : अपहरण करून नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- चेन्नई विमानतळावरून अपहरण करून आणलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याला पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात आणल्यावर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळले.

या अधिकाऱ्याचा मुंबईत शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरजकुमार मिथिलेश दुबे (२७, रा. झारखंड, रांची) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

सुरजकुमार यांचे अपहरण करण्यात आल्यावर ५ फेब्रुवारी रोजी वेवजी गावच्या जंगलात आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आले.

या घटनेची माहिती घोलवड पोलिसांना मिळताच त्यांनी गंभीर होरपळलेल्या दुबे यांना उपचारार्थ डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

तेथून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवल्यानंतर तेथे शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरजकुमार हे २००१ साली भारतीय नौदलात ‘सिबिंग सीमॅन’ पदी रुजू झाले होते.

सुरजकुमार हे ३१ जानेवारी रोजी चेन्नई विमानतळावर पोहोचले होते. तेथे तीन अज्ञातांनी त्यांचे अपहरण करून त्यांना तीन दिवस चेन्नईत अज्ञात स्थळी डांबून ठेवले व त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

मात्र त्यांनी खंडणीला नकार दिल्यानंतर कारमधून त्यांना ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास आणण्यात आले.

तेथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्यांच्या शरीरावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. घटनेनंतर दुपारच्या सुमारास जंगलात होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्वरित घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत वेवजी पोलीस चौकीला माहिती दिली.

त्यावर पोलिसांनी तत्काळ दुबे यांना डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सुरजकुमार यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत ही माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment