अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-येथील बासपासवर अनेक वेळा रात्रीच्यावेळी ट्रकचालकांना लुटण्याच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र मध्यंतरी पोलिसांनी या प्रकाराला काहीसा आळा घातला होता.
परंतु परत एकदा या चोरट्यांनी डोके वर काढले आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान डंपरला दोन चारचाकी वाहने आडवी लावून त्यास शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या खिशातून २० हजार रूपयाची रक्कम काढून घेतली.
निंबळक (ता. नगर) बायपास शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी बापू सोनवणे (रा. हिंगणगाव ता. नगर) व इतर अनोळखी ७ ते८ इसमांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डंपर चालक नरोत्तर गुठारी सिंग (वय ५० रा. मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री नरोत्तर सिंग हे त्यांच्या ताब्यातील हायवा डंपर (एमएच १२ क्यूजी ४६८२) निंबळक बायपास रोडने सांगलीकडे घेऊन चालले होते.
रात्री साडेदहाच्या सुमारास लामखेडे पेट्रोलपंपाजवळ आरोपींनी फॉच्युनर (एमएच १२ पीसी ९९९) व विना नंबरची स्कॉर्पिओ नरोत्तर सिंग यांच्या ताब्यातील डंपरला आडवी लावली.
आरोपींनी नरोत्तर सिंग यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व सिंग यांच्याकडील २० हजार रूपयाची रक्कम काढून घेतली.
सिंग यांनी दुसऱ्या दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved