नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तानातील तणाव वाढतच चालला आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाकिस्तानने दोन्ही देशांच्या दरम्यान सुरू असलेली टपाल सेवा बंद केली आहे.
मागील दीड महिन्यापासून भारतातून येणारी पत्र घेणे बंद केले आहे. यामुळे दोन्ही देशांत सुरू असलेली ही टपाल सेवा आता खंडित झाली आहे.
भारतीय डाक विभागाच्या उपमहासंचालक अजय कुमार रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकिस्तानच्या सीमा शुल्क विभागाने २३ ऑगस्ट रोजी एक आदेश काढून पाकिस्तानातून भारतात पाठवल्या जाणाऱ्या सर्व टपालावर बंदी घालण्यात आलेली आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानातून येणारी सर्व पत्रे ही सौदी अरेबियाच्या एअरलाईन्समधून भारतात येत असत. पाकिस्तानचा हा आदेश एकतर्फी आहे. या आदेशाची अंमलबजावणी २७ ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. यामुळे नाइलाजास्तव भारताला पाकिस्तानात जाणारी पत्रे संकलित करणे थांबवावे लागत आहे. याबाबतच्या अधिक माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी भारत सरकारने जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा रद्द करणे आणि त्याचे दोन भागात विभाजन करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाच्या विरोधात आता पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. भारत-पाकिस्तान शांतता कार्यकर्त्याकडून टपाल सेवा रोखणे हे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटलेले आहे. कोणताही देश असे लोकांचे अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही. यापूर्वी असे कधीही झालेले नव्हते, असे त्याचे मत आहे. भारताची फाळणी झाली. तीन वेळा युद्ध झाले, परंतु असे कधी घडलेच नाही. ते आता पाकिस्तानने करून दाखवले आहे.