नाशिक : लोकसभा निवडणुकीत यादीत नाव नसल्याची तक्रार करणाऱ्या भुजबळ कुटुंबीयांनी आता विधानसभा निवडणुकीत मात्र मतदानाकडे पाठ फिरवली. माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ येवला व नांदगाव मतदारसंघातच अडकून पडल्यामुळे त्यांनी त्यांच्या मतदारयादीतील विधानसभेसाठी मात्र मतदान केले नाही!
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ कुटुंबीय नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र मतदार यादीत समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांचे नाव नसल्याने, भुजबळ कुटुंबियांनी निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली होती.
त्यानंतर मात्र मातोश्रींचे नाव हे मुंबईतील भायखळा मतदारसंघात असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले होते. यंदा मतदार यादीत भुजबळ कुटुंबीयांचे नाव असूनही त्यांनी मतदान केले नाही. माजी मंत्री भुजबळ हे सोमवारी मतदानाच्या दिवशी दिवसभर येवला मतदारसंघात होते.
भुजबळांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदारांशी संवाद साधत अभिवादन देखील केले. तर आमदार पंकज भुजबळ हे नांदगाव मतदारसंघात होते. दिवसभर त्यांनी मतदान केंद्रांना भेटी देत, मतदारांना साद घातली. याशिवाय समीर भुजबळ यांसह कुटुंबीय देखील दोन्ही मतदारसंघात व्यस्त दिसत होते.
दुपारनंतर भुजबळ कुटुंबीय मतदानासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात भुजबळ कुटुंबीय मतदानासाठी दाखल झाले नाही. दहा वर्षांपूर्वी मतदानासाठी भुजबळ स्वत: मुंबईला हेलिकॉप्टरने रवाना झाले होते. मुंबईत मतदान करून येवल्यात ते दाखल झाले होते, हे विशेष!