पिंपरी : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले असतानाही ते मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सकाळीच मतदान केंद्रात दाखल झाले. मात्र ईव्हीएम मशीनसमोरच त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल रहीम नूरमोहम्मद शेख (६०, रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. शेख हे पूर्वी भोसरीत राहत होते. ते दोन वर्षांपूर्वी बारामतीमध्ये राहण्यास गेले होते.
तसेच चार महिन्यांपूर्वी त्यांना घशाचा कॅन्सर झाला असून उपचार सुरू होते. त्यांचे मतदान भोसरीत असल्याने सोमवारी सकाळी ते शांतीनगर येथील महात्मा फुले शाळेत मतदानासाठी आले होते. त्या वेळी मतदान केंद्रात तुरळक गर्दी होती.
मतदान करण्यासाठी त्यांचा नंबर आला असता त्यांना घाम फुटला व छातीत दुखू लागले. त्यामुळे ते खुर्चीत बसले व बेशुद्ध पडले. त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.