मोटरसायकल प्रशिक्षणामुळे चोऱ्यांना आळा बसेल!: जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-सद्यस्थितीत नगर शहरासह जिल्हाभरात मोटरसायकलवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे प्रमाण वाढत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांना वेगळ्या प्रकारचे मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

नगर-कल्याण महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज इंजीनियरिंग कॉलेजमध्ये जिल्हाभरातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोटारसायकल प्रशिक्षणाच्या वेळी पाटील बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, दिवसेंदिवस रस्त्यांवरील गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्त्यावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करायचे असल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन पद्धतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

ही बाब लक्षात घेता आज जिल्हाभरातील बीटवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोटरसायकल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात रस्त्यावरील गुन्हा घडल्यास पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करताना वाहन कशाप्रकारे चालवायचे, आरोपीचा पाठलाग करताना नागरिकांची सुरक्षितता कशाप्रकारे जपायची,

तसेच आरोपीला सुरक्षित पद्धतीने कसे पकडायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा फायदा भविष्यामध्ये एकाही घटनेचा तपास करण्यासाठी झाला तर आजचे प्रशिक्षण लाभदायी ठरेल, असाही विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रशिक्षणात जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. नवीन प्रकारची माहिती समजावून घेण्याचा जो प्रयत्न अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे, तो नक्कीच प्रशंसनीय असल्याचेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe