नंदूरबार : राज्यातील प्रथम क्रमांकाच्या अक्कलकुवा मतदारसंघातील प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र असलेल्या मणिबेली या केंद्रावर केवळ एकच मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ३२८ पैकी ३२७ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.
अक्कलकुवा-अक्राणी हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार संघ आहे. तर याच मतदार संघात मणिबेली हे प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. अतिदुर्गम भागात असलेले हे मतदान केंद्र हे नर्मदा नदीपलीकडे आहे.
या मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना बार्जने जावे लागते. सरदार सरोवर प्रकल्पामुळे मणिबेली व परिसरातील नागरिकांचे गुजरात व महाराष्ट्रात पुनर्वसन झाले आहे. मात्र अद्यापही काही कुटुंबांचे योग्य पुनर्वसन न झाल्याने ते मणिबेली येथेच राहत असून या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत त्यांची घरे व जमिनी पाण्याखाली गेली आहेत.
प्रशासनामार्फत विस्थापितांच्या मागण्यांकडे करण्यात आलेले दुर्लक्ष तसेच कोणत्याही सोयी-सुविधा न पुरविल्याने येथील मतदारांनी अचानक मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे या केंद्रावर ३२८ पैकी केवळ एकाच मतदाराने मतदान केले.