EVM गडबडीबद्दल कबुली देणाऱ्या भाजप उमेदवाराबद्दल राहूल गांधी म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : ‘मतदान यंत्रातील गडबडीची जाहीर कबुली देणारे भाजप उमेदवार बख्शीशसिंह विर्क हे सत्ताधारी पक्षातील एकमेव इमानदार व्यक्ती आहेत,’ असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपला हाणला आहे.

भाजपचे हरयाणातील उमेदवार बख्शीशसिंह विर्क यांनी रविवारी ‘विधानसभा निवडणुकीत कुणालाही मत दिले तरी ते भाजपलाच मिळणार’ असल्याचा वादग्रस्त दावा केला होता. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. 

राहुल गांधी यांनी सोमवारी त्यांच्या विधानाचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. ‘हे भाजपचे सर्वात इमानदार व्यक्ती आहेत,’ असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. सिंह यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावून त्यांच्या असंध विधानसभा मतदारसंघात एका विशेष पर्यवेक्षकाची नियुक्ती केली आहे. 

‘तुम्ही कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाच्या फुलालाच मिळेल. आज तुम्ही चूक केली तर त्याचे फळ तुम्हाला ५ वर्षे भोगावे लागेल. तुम्ही मत कुणाला दिले, हे आम्हाला कळेल. मोदी व मनोहरलाल खट्टर यांची नजर खूप तीक्ष्ण आहे. तुम्ही मत कुठेही टाकले तरी शेवटी फूलच निघणार आहे. 

आम्ही यासाठी ईव्हीएममध्ये योग्य ते बदल केलेत,’ असे विर्क आपल्या व्हिडिओत बोलताना दिसून येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ बोगस असल्याचा दावा करत हा भाजपला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment