अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याविषयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.
या विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे ७० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच निकाल तयार करून प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुद्धा खूप वेळखाऊ आहे. त्यात कोरोनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे.
कोरोना काळात विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाने २०१९-२०२० शैक्षणिक वर्षातील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या. सुरवातीला या परीक्षा घेताना अडचणी आल्या मात्र त्यात सुधारणा झाल्या आहेत.
पुणे विद्यापीठाने कोरोनामुळे अंतिमवर्षाच्या विद्यार्थ्यांसह अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली.
ऑनलाइनमुळे वेळेची बचत होऊन महिन्याभरात विद्यार्थ्यांना निकाल देणे शक्य होणार आहे. त्यामुळे २०२१- २१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा येत्या मार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved