बुलडाणा : खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील एका माजी सैनिकासह त्याच्या दोन मुलांचे मृतदेह २१ ऑक्टोबर रोजी सकाळी विहिरीत आढळून आले. त्यांच्यासोबत अपघात घडला की, त्यांनी आत्महत्या केली याविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
आंबेटाकळीचे रहिवासी असलेले गोपाल चराटे (वय ३६) सैन्यात कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी सेवा समाप्तीनंतर ते गावी परतले. दरम्यान, सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी आंबेटाकळी गावाजवळील एका विहिरीमध्ये माजी सैनिक चराटे यांच्यासह मुलगी खुशी चराटे (१३) आणि मुलगा यश चराटे (११) यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेबाबत नागरिकांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह विहिरीबाहेर काढले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. माजी सैनिक गोपाल चराटे हे शहरातील घाटपुरी भागात राहात होते. रविवारी ते दोन्ही मुलांना घेऊन मूळगावी आंबेटाकळी येथे गेले होते. त्यांनी मुलांसह आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
मात्र, सैन्यात प्रत्येक जवानाला पोहोण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते आत्महत्या कसे करतील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एखादा मुलगा किंवा मुलगी विहिरीत पडली असावी आणि त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सर्वच जण बुडाले असावे, मुलांचा जीव वाचवीत असताना मुलांनी वडिलांना घट्ट पकडून ठेवले असावे.
त्यामुळे तिघांचाही बुडून मृत्यू झाला असावा, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे आंबेटाकळीसह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.