अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज तसेच कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला, तरच शेतीचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेता वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते.
मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे. त्याच सोबत कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार विभागास सहकारमंत्र्यांनी दिल्या.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved