अखेर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘त्या’माजी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-पारनेर तालुक्यातील निघोज ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन सदस्यांच्या अपहरणासंदर्भात बातम्या दिल्याच्या रागातून, निघोजचे माजी सरपंच ठकाराम लंके यांनी जाहीर सभेत पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले होते.

यासंदर्भात तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांची भेट घेऊन ठकाराम लंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

या प्रकरणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी लंके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सरपंच, उपसरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन सदस्यांचे विरोधी गटाने अपहरण केल्याच्या निषेधार्थ आज निघोज पोलिस दूरक्षेत्रात लंके गटाने ठिय्या आंदोलन केले.

यावेळी बोलताना लंके यांनी पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले होते. दरम्यान पारनेर पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या निषेध सभेत तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी लंके यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध केला.ठकाराम लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान  ठकाराम लंके गेली पाच वर्षे निघोज येथील सरपंचपदावर होते.

त्यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली. निघोज येथील दारूबंदी कृती समितीच्या महिलांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत, मतदानाच्या माध्यमातून दारूबंदी केली होती.

त्यासाठी महिलांनी परिश्रम घेतले होते.मात्र तत्कालीन सरपंच ठकाराम लंके यांनी दारूबंदी हटवण्यासाठी पुढाकार घेतला.महिलांनी परिश्रमाने लागू केलेली दारूबंदी हटवण्यात आली.

त्यासंदर्भातील वस्तूनिष्ठ बातम्या विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या.या रागातून लंके यांनी आज पत्रकारांवर आगपाखड केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe