अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात व परिसरात झालेल्या गुन्ह्यांचा तपास लागावा म्हणून पोलिस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात उपस्थित सर्वांनीच आपला मोठा रोष व्यक्त केला.
राहुरी फॅक्टरी परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येथील विविध संघटना व्यापारी नागरिक यांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना निवेदन देऊन दहा दिवसांमध्ये या गुन्ह्याचा तपास न लागल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला होता.
त्यानुसार काल बुधवारी सकाळी १० वाजता नगर- मनमाड रोडवर डॉ.आंबेडकर चौकामध्ये परिसरातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी आदी मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र, प्रशासनाच्या विनंतीवरून रास्ता रोको न करता रस्त्याच्या कडेला या सर्व नागरिकांची बैठक घेण्यात आली.
यावेळी नागरिकांनी रोष व्यक्त करत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांना येणाऱ्या समस्या व त्याकडे पोलिसांचे असणारे दुर्लक्ष याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला. या गुन्हेगारीचा तातडीने बंदोबस्त व्हावा, अशी मागणी केली. निवेदनात म्हंटले आहे कि, शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे.
सामान्य नागरिक या वाढत्या गुन्हेगारीला वैतागलेले आहेत. या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत. तसेच देवळाली प्रवरा पोलीस स्टेशन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे.
नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज असून परिसरातील अवैद्य धंदे लवकरच बंद करणार आहोत. असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved