श्रीगोंदे – परतीच्या पावसाने श्रीगोंदे तालुक्यात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कोळगाव, पारगाव, घारगाव, येळपणे, येथील नद्यांना पूर आला. दुथड्या भरून वाहणाऱ्या नद्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारी रात्री ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. २-३ तास चाललेल्या पावसाने गावातील मुख्य रस्त्यांवर दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी साचले होते. घारगाव येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांमध्ये, तसेच घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सलग २ तास मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतातील ताली फुटून पिकांचे नुकसान झाले.
कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतकरी अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. गेली तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिण्याचा, तसेच शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस रब्बीच्या पिकांसाठी उपयुक्त आहे. नद्यांवर असणारे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वहात आहेत.
श्रीगोंदे शहरात १८ मिमी, पेडगावात ९ मिमी, काष्टीत १९ मिमी, चिंभळे येथे ४७ मिमी, बेलवंडीत ३५ मिमी, कोळगावात ८२ मिमी, देवदैठण येथे ३२ मिमी, तर मांडवगणमध्ये १२ मिमी पाऊस झाला.
कोळगाव परिसरात गेल्या २ वर्षांपूर्वी नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले होते. पळसा नदीवर ६ किलोमीटरमध्ये १८ बंधारे आहेत. हे सर्व बंधारे नुकत्याच झालेल्या पावसामुळे भरल्याने दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत होईल. झालेल्या पावसाने कोळगाव परिसर जलमय झाला आहे, असे कोळगावचे उपसरपंच नितीन नलगे यांनी सांगितले.