अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी सरपंचपदाच्या निवडी जाहीर झाल्या आहेत.
नुकतेच जामखेड तालुक्यातील मोहा गावच्या ग्रामस्थांनी गावचा कारभार सासू-सुनेच्या जोडीकडे सोपविला आहे. गावच्या सरपंचपदी सारीका शिवाजी डोंगरे यांची तर उपसरपंचपदी त्यांची सून स्वाती वामन डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आरक्षणामुळे अनेक गावांत महिलाराज आले आहे. जेथे महिला सरपंच झाल्या, तेथे उपसरपंचपद पुरुषाला देण्यात आले आहे. असे असताना मोहा गावात मात्र दोन्ही पदे महिलांकडे तेही चक्क सासू-सुनेकडे देण्यात आली आहेत.
या गावात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे समर्थक शिवाजी डोंगरे व भिमराव कापसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नऊ पैकी आठ जागा जिंकून सत्ता मिळविली आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्याच ताब्यात सत्ता होती. मागील अडीच वर्षांपासून सारिका डोंगरे याच सरपंच होत्या. यावेळी सरपंचपद महिलेसाठी आरक्षित झाले.
त्या जागेवर पुन्हा सारिका डोंगरे यांची वर्णी लावण्याचे निवडून आलेल्या सदस्यांनी ठरविले. त्याही पुढे जाऊन उपसरपंचपदी त्यांच्या सून स्वाती यांना निवडून देण्याचे ठरले.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर सरपंच पदासाठी सारीका डोंगरे यांनी तर उपसरपंच पदासाठी स्वाती डोंगरे यांनी अर्ज भरले दुसरा एकही अर्ज न आल्याने या दोघींची बिनविरोध निवड झाली.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved