अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने पुणे-नाशिक महामार्गाखालील बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना अडवून लूटमार करणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे पथकासह रात्रीच्या गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना गुप्त खबर्यामार्फत पुणे-नाशिक महामार्गाखालील बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन पाच इमस दुचाकी उभ्या करुन प्रवाशांना अडवून लूटमार करत आहे.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन चौघांना मोठ्या शिताफीने पकडले तर एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी पकडलेल्या चौघांची झडती घेतली असता आरोपी जालिंदर मच्छिंद्र बर्डे (वय 30, रा.गुहा, ता.राहुरी) याच्या पाठीवरील बॅगेत मोबाईल, धार असलेली लोखंडी वाकस, लाकडी दांडा, लोखंडी कटावणी, करवत व दगडं मिळाली.
दुसरा आरोपी गणेश उर्फ अजय मच्छिंद्र गायकवाड (वय 23, रा.गुहा, ता.राहुरी) याच्या खिशात मिरची पूड व मोबाईल मिळाला. लखन अर्जुन पिंपळे (वय 30, रा.दोडरवीर, ता.सिन्नर) याच्या खिशात मोबाईल, दोरी व गलोल मिळाली तर चौथा आरोपी सोमनाथ अर्जुन पवार (वय 21, रा.बाजारवाकडी, ता.नगर) मोबाईल, मिरची पूड व गलोल मिळाली.
तसेच दोन दुचाकी डिस्कव्हर (क्र.एमएच.17, एडी.7354) आणि (एमएच.12, सीडब्ल्यू.4292) जप्त करण्यात आल्या आहेत. पळून गेलेल्या आरोपीचे नाव अशोक हरिभाऊ बनवटे (रा.श्रीरामपूर, मूळ-कोतूळ, ता.अकोले) असल्याचे सांगितले.
या प्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर करुन पेालीस कोठडी घेतली आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved