25 वर्षापासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत भाजपाच्या हाती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता संभाजी कातकडे यांची तर उपसरपंचपदी नवनाथ तुकाराम बळीद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दरम्यान या निवडणुकीचे विशेषबाब म्हणजे २५ वर्षापासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायतीची सत्ता पहिल्यांदाच भाजपाच्या हाती आली आहे.

ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत युवा कार्यकर्ते संभाजी कातकडे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनेलने ६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले.

बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी सरपंच गहिनीनाथ कातकडे यांच्या जनसेवा ग्रामविकास पॅनलला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले.

सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीसाठी अध्यासी अधिकारी अनिल सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्य विशेष सभेत सरपंच पदासाठी सुनीता कातकडे तर, उपसरपंच पदासाठी नवनाथ बळीद या दोघांनी अर्ज दाखल केले. दोन्ही अर्ज छाननीत वैध ठरल्याने कातकडे व बळीद यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe