अहमदनगर जिल्ह्यातील त्या चोरी प्रकरणातील सोन्याचे दागिने हस्तगत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुक्यातील मालदाड येथून बॅगमधे ठेवलेले १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक (मूळ रा. समशेरपूर, ता. अकोले) यास अटक करून दागिने हस्तगत केले.

आश्चर्य म्हणजे आरोपीने हे दागिने एका नामांकित पतसंस्थेत गहाण ठेवून कर्जही काढले होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांनी सांगितले, की संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील दि. १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भाऊपाटील देवराम नवले (वय ४१ वर्षे) यांच्या घरासमोरून बॅगेतून ७५ हजार रुपये किंमतीचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे पान तसेच १ लाख रुपये किंमतीचे प्रत्येकी १० ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे कॉईन मिळून एकूण १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास करण्यात आले होते.

भाऊपाटील नवले यांनी मुंबई येथून भावाला व बहिणीला गावी मालदाड येथे आणण्यासाठी चारचाकी गाडी पाठविली होती. या गाडीवर चालक म्हणून रविकिरण मंडलिक याला पाठविले होते. दि. १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजता मंडलिक याने भाऊपाटील नवले यांच्या भावाला व बहिणीला मालदाड येथे घरी आणून सोडले.

यावेळी गाडीतील बॅगा रविकिरण मंडलिक याने घरासमोर आणून ठेवल्या होत्या. बहीण मानसी राहुल वाळूंज ही दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी मुंबई येथे जाण्यासाठी निघाली असता बॅगमधे दागिने नव्हते. त्यामुळे मंडलिक यानेच दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद भाऊपाटील नवले (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांनी दिली होती.

त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या सोन्याचे दागिने चोरीप्रकरणी आरोपी मंडलिक (मूळ रा. समशेरपूर, हल्ली रा. संगमनेर) यास पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात आरोपीने १० ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे कॉईन राहाता येथील सोनारास विकले होते, तर संगमनेर येथील एका नामांकित पतसंस्थेत ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे पान कर्ज काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपीस न्यायालयाकडून पोलीस कस्टडी मिळवीत चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी रविकिरण मंडलिक याच्याकडून दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe