जिल्हा बँक: चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले चिन्ह वाटप

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

शुक्रवारी या आठही उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी चिन्ह वाटप केले आहे. कपबशी, विमान व छत्री ही त्यांची चिन्हे आहेत.

डीडीआर दिग्विजय आहेर यांच्या निगराणीत एडीसीसी नावाने सहकार क्षेत्रात ख्यातकिर्त असणाऱ्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

यावेळी बँकेच्या इतिहासात प्रथमच संचालक पदासाठी विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननी प्रक्रियेनंतर १९८ अर्ज वैध ठरले.

त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत विक्रमी संख्येनेच अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे २१ पैकी १७ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या.

मात्र, सेवा सोसायटी मतदारसंघाच्या तीन व  बिगरशेती संस्था मतदारसंघाची एक अशा चार जागांसाठी प्रत्येकी दोन जणांची उमेदवारी कायम राहिली.

या आठ उमेदवारात विद्यमान संचालक मंडळातील पाच संचालकांचा समावेश आहे. सेवा सोसायटी नगरसाठी माजी मंत्री व विद्यामान संचालक शिवाजी कर्डीले आणि सत्यभामाबाई बेरड,

सेवा सोसायटी कर्जतसाठी विद्यमान संचालक अंबादास पिसाळ व मिनाक्षी साळुंके तर सेवा सोसायटी पारनेरसाठी विद्यमान संचालक उदय शेळके आणि रामदास भोसले यांच्यात सरळ लढत होणार आहे. बिगरशेती संस्था मतदारसंघातही विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे आणि प्रशांत गायकवाड यांच्यात दुरंगी सामना होणार आहे.