अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- करोनाच्या लॉकडाऊन मुळे अगोदरच शेतकरी चिंताग्रस्त झाला त्यात अतिवृष्टी मुळे उभी पिके वाया गेली. सरकारने मदतीच्या केवळ घोषणा केल्या मात्र दमडीचीही मदत शेतकर्यांना मिळाली नाही.
त्यातच आता महावितरणच्या वसुली धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. महावितरणने सध्या थकबाकी वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली व्हावी म्हणून रोहित्र बंद करण्याचे सत्र सुरू केले आहे.
पिकवलेल्या पिकाला कवडीचे मोल मिळाल्यामुळे एकीकडे शेतातील उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ आली असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
एकीकडे कोरोनाचे संकट व त्यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, त्यात रोहित्र बंद करण्याच्या सत्रामुळे उभे पीक जळून जात आहे. डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेला घास समोर जाताना दिसतोय.
अत्यंत उत्साहाने शेतीकडे वळलेल्या युवकांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. या परिस्थितीत महावितरणने रोहित्र बंद करण्याचे सत्र थांबवून शेतकऱ्यांना सहकार्य करावे व याकरिता लोकप्रतिनिधींनी बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून महावितरणकडून होणारी कारवाई थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved