राहुरी – निवडणुकीच्या सुरुवातीला आ. कर्डिले यांनी आपण १ लाख मताधिक्क्याने निवडून येवू, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. मात्र निवडणुकीदरम्यान राहुरी तालुक्याच्या मतदारांमध्ये झालेली एकी, पाथर्डी – नगर भागात गेल्या दोन निवडणुकीपेक्षा तनपुरेंची सुधारलेली परिस्थिती पहाता उद्याच्या निकालाची तनपुरे गटाला उत्सुकता आहे.
तर आ. कर्डिले गटाला धाकधूक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या प्रारंभी कर्डिले एकदम जोरात होते. मात्र त्यानंतर राहुरी तालुक्याची जागृत झालेली अस्मिता, शरद पवार यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने मिळालेला तरुण उमेदवार यामुळे निवडणूक प्रचारात अचानक प्राजक्त तनपुरे यांनी उठाव घेतला दुसरीकडे गेल्या १० वर्षापासून कर्डिले यांनी राहुरी तालक्यात चांगलाच जम बसविला.
पहिल्या निवडणुकीपेक्षा दुसऱ्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्क्य वाढलेले दिसले. शिवाय विखे गटाची साथ यामुळे कर्डिले गट निश्चिंत होता. मात्र हा निश्चिंतपणा प्रत्यक्षात निवडणूक सुरु झाल्यावर राहिला नाही.
स्व. शिवाजी गाडे यांचे चिरंजीव धनराज गाडे यांनी प्राजक्त तनपुरे यांना दिलेली साथ याशिवाय राहुरी शहरातील २२ प्रभागातून प्राजक्त तनपुरे यांना मिळालेला प्रतिसाद यामुळे चुरस वाढलेली आहे. १ लाख ९९ हजार २७३ म्हणजे सुमारे २ लाख मतदान झाले. पैकी १ लाख २५ हजार मतदान राहुरी शहर व तालुक्यात झाल्याचे समजते. तर ७५ हजार मतदान नगर व पाथर्डी तालुक्यातील गावातून झाले.
त्यामुळे राहुरी तालुक्यात प्राजक्त तनपुरे यांचा टक्का किती वर जातो त्यावर निकालाचे पारडे ठरणार आहे. त्याचप्रमाणे नगर पाथर्डीमध्ये यंदा तनपुरेंना पूर्वीपेक्षा चांगली परिस्थिती होती, असे सांगितले जाते. त्यामुळे राहुरीची फाईटही अत्यंत क्लोज होणार आहे.हे मात्र नक्की!