विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर शिवसेना – भाजप महायुतीचे पारडे जड दिसून येत आहे. नगर जिल्ह्यामध्ये विद्यमान ११ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेने चार, भाजपने आठ, काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादीने आठ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.
श्रीगोंद्यामध्ये राहुल जगताप यांनी निवडणूक न लविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप युतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना ही निवडणूक सोपी गेल्याची चर्चा आहे .
पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये चौथ्यांदा शिवसेना महायुतीचे उमेदवार विजय ओटी यांचे पाडे पुन्हा जड झाले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये मोठी उभी फूट पडली आहे.
जामखेड हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शवगाव – पाथर्डी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यात लढत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांमुळे राजळे यांनी मताधिक्य मिळेल, असे बोलले जात आहे.
नगर शहर मतदारसंघामध्ये शिवसेना – भाजप एकत्र आल्यामुळे यंदा राठोड यांचे राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांच्याविरोधात पारडे जड आहे.
नेवासा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच राष्ट्रवादीच्या विठ्ठल लंघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विद्यमान आ. बाळासाहेब मुरकुटे यांना फायदा होणार आहे.
संगमनेरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले हे त्यांच्याविरोधात आहेत. या ठिकाणी राधाकृष्ण विखे यांनी महायुती विजय होण्यासाठी मोठी फळी नवले यांच्यामागे उभी केली आहे. त्यामुळे येथील लढतसुद्धा लक्षवेधी ठरली आहे.
कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, अकोला, राहुरी मतदारसंघातही महायुतीचेच उमेदवार आघाडीवर राहतील असे चित्र आहे. एकंदरीत नगर जिल्ह्यामध्ये मतदानाची वाढलेली टक्केवारी महायुतीच्या फायद्याचीच ठरणार आहे.