रस्ता चौपदरी होणार; अतिक्रमणधारकांना बजावल्या नोटिसा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामकाज सुरु आहे. यातच श्रीरामपूर-बेलापूर रस्ता चौपदरीकरणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

यासाठी रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्यासाठीची तयारी सुरु झाली असून येत्या दोन दिवसात या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहे.

कोपरगाव (झगडेफाटा) ते राहुरी फॅक्टरी या राज्य मार्ग क्र. 36 चे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्तावित असला तरी त्यासाठी निधी उपलब्द नसल्याने काम रेंगाळले होते.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यात श्रीरामपूर शहर हद्दीवरील वेशीपासून पुढे दोन किलोमिटर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु होणार आहे.

या रस्त्याचे दोन्ही बाजुने 15 मिटरचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान या रस्त्यावर वेशीपासून पुढे मोठ्या प्रमणावर अतिक्रमण झाले आहे.

अनेक व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर पक्की तसेच काहींनी लोखंडी पत्र्यांची गाळे तयार करून अतिक्रमण केले आहे.

रस्त्याचे काम सुरु होण्यापूर्वी हे अतिक्रमण काढावे लागणार आहे. ते काढण्यासाठी येत्या सोमवार दि.22 फेब्रुवारी 2021 पासून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहे.

येत्या मार्च महिन्यापासून कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असल्याने हे अतिक्रमण तातडीने काढले जाणार आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe