अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार जागांसाठी शनिवारी मतदान सुरु आहे. माजी मंत्री शिवाजी कार्डिले यांची जागा बिनविरोध होऊ न शकल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जाव लागत आहे. नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था गटात शिवाजी कर्डिले आणि सत्यभामाबाई बेरड यांच्यात लढत होत आहे.
यापार्श्वभूमीवर कार्डिले यांनी बिनविरोध न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा होती. मात्र जिल्ह्यातील काहींनी जाणून बुजून ही निवडणूक लावली असल्याचा आरोप कर्डीले यांनी केला असून, निकालानंतर पत्रकार परिषद घेवून आपण रोखठोक भूमिका मांडण्याचे जाहीर केले आहे.
समोरच्या उमेदवाराला सूचक आणि अनुमोदक देखील नव्हता, त्यामुळे ही निवडणूक जाणून-बुजून लागली आहे. असे मत कार्डिले यांनी व्यक्त केलं आहे.
तर उद्या समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जाईल आणि माझाच विजय नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ज्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक घोषित झाली, त्यादिवशी शेतकर्याची बँक म्हणून माझी प्रामाणिक इच्छा होती की पक्ष पातळीवर राजकारण होऊ नये.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी, त्यासाठी मी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे पाटील यांना भेटून मी तसा प्रयत्न केला. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, असे कार्डिले म्हणाले.
माझ्यासाठी ही जागा कुठल्याही प्रकारे प्रतिष्ठेची नसून माझ्याकडे १०२ ठराव आहेत. तर, अर्ज भरण्याच्या दिवशी देखील ते हजर होते. मात्र, जाणीवपूर्वक ही निवडणूक काही मंडळींनी लावली असा आरोप कर्डिले यांनी केलाय. तसेच माझं वर्चस्व जिल्ह्यातील काही दिग्गज मंडळींना मान्य नसावे, त्यामुळे ही निवडणूक लागावी अशी त्यांची इच्छा असते, अस परखड मत त्यांनी व्यक्त केले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved