अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचांना कोरोनाची लस द्या !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- आरोग्य सेवक, पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविषयी शासनाचे सूचना व निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून कोरोना महामारीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी

महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या सरपंचांना कोरोनाची लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी राहाता तालुक्यातील खडकेवाकेचे सरपंच सचिन मुरादे यांनी केली आहे.

यासंदर्भात पत्रकात मुरादे यांनी म्हटले, की कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना व लॉकडाऊनच्या कालावधीत आरोग्य विभागातील डॉक्टर व सर्व कर्मचारी तसेच पोलिस व महसूल विभाग व प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याचे रक्षणार्थ महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे.

या सर्वांप्रमाणेच लॉकडाऊन व महामारीच्या या भयानक परिस्थितीत प्रत्येक गावच्या कुटुंबप्रमुख असलेल्या सरपंचावर गावच्या रक्षणासाठी कोरोना योद्धा म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी होती व आतासुद्धा आहे. कोरोनाचे रुग्ण सध्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची चर्चा आहे.

गावचा प्रथम नागरिक असलेल्या सरपंचांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आजही रात्रंदिवस गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागत आहे. प्राधान्यक्रमाने सरपंचाला कोविडची लस दिली जावी, यासाठी शासनाने संबंधित विभागाला आदेश जारी करावेत. यासाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सरपंचांचे शिष्टमंडळ भेटणार आहे, असे मुरादे यांनी सांगितले.