अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यातील प्रत्येक गावात अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
याचाच भाग म्हणून 1 हजार 316 गावातील मागासवर्गीय वस्ती लोकसंख्याच्या प्रमाणात निधी देवून खुली व्यायाम शाळा उभारण्यात येणार आहे.

राज्यात नगर जिल्ह्यासाठी हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी दिली.
अनुसूचित व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेंतर्गत समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यात विशेष बाब म्हणून खुली व्यायामशाळा साहित्य देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यातील घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी जिल्हास्तरीय
विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जातात. यात पाणी पुरवठ्याची कामे, मलनिस्सारण, वीज, गटर बांधणे, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर बांधकामांचा समावेश आहे. मात्र यात खुली व्यायामशाळा साहित्याचा समावेश नव्हता.
त्यामुळे समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. मुंडे यांनी नगर जिल्ह्याकरिता विशेष बाब म्हणून खुल्या व्यायामशाळेत साहित्य देण्यास निधी देण्याचे मान्य केले.
ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये तरूण, तरुणी, महिला आणि पुरुष तंदूरूस्त राहण्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे.
ही योजना तातडीने राबविण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन सभापती परहर यांनी केले आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावरून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|