अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- वीज वाहक तारांमुळे शॉर्टसर्किट झाल्याने उभा असलेल्या आठ एकर ऊस आगीमुळे जळून भस्मसात झाला, याघटनेत सुमारे वीस लाखाचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचोली फाटा येथे नगर मनमाड महामार्गजवळ हॉटेल सह्याद्री समोर गट नंबर १८४ मध्ये नंदकिशोर रावसाहेब पठारे यांची एक हेक्टर, जया दादासाहेब पठारे यांची एक हेक्टर,
दत्तात्रय काशीनाथ पठारे यांची दोन एकर, कांताबाई दत्तात्रय पठारे यांची एक एकर असे आठ एकर क्षेत्रावर गळीतासाठी ऊस उभा आहे. या क्षेत्रात महापारेषण कंपनीचा टॉवर मधून विजेच्या तारा गेलेल्या आहेत.
या तारा लोंबकळत असलेल्या अवस्थेत असल्याने ऊसाला टेकल्या होत्या. या तारांची पाच ते सहा वेळेस घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने जाळाचे लोट उसावर पडल्याने संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
आग विझवण्यासाठी राहुरी नगर परिषद, देवळाली नगरपरिषद, विखे पाटील कारखाना यांचे अग्निशमन दलाचे बंब येऊन त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या आगीमध्ये आठ एकर उसासह संपूर्ण क्षेत्रातील ठिबक संच,
पाईप व इलेक्ट्रिक मोटार केबल आदीसह अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नंदकिशोर पठारे यांनी सांगितले. याठिकाणी महापारेषणचे अधिकारी यादव यांनी भेट देऊन पाहणी केली.
तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले. यावेळी सरपंच गणेश हारदे, महावितरणचे उपअभियंता गाढे, तलाठी श्रीमती गायसमुद्रे, विजय नारोटे, विखे कारखान्याचे पावडे, वाघमोडे यांनी येऊन पाहणी करून या शेतकऱ्यांना धीर दिला .
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|