अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरात मोकाट वराहांचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत होता. वराह मालकांना सांगुनही ते आपल्या वराहांचा बंदोबस्त करत नव्हते अखेर जामखेड नगरपरिषदेमार्फत मोकाट डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी तामिळनाडू येथुन एक पथक पाचारण करण्यात आले आहे.
त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत जामखेड शहर वराह मुक्त होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये जामखेड नगरपरिषदेने सहभाग घेतला आहे व आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेडसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी शासकीय यंत्रणेसोबत निमशासकीय व व्यापारी व नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला जात आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबविले जात आहे. जामखेड नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर मोकाट वराहांचा वावर आहे. अनेक वेळा या वराहांनी लहान मुलांवर प्राणघातक हल्ले केलेले आहेत. तसेच ही वराह शहरात मोठय़ा प्रमाणावर घाण करतात याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या बाबत मुळ वराह मालकांना या वराहांचा बंदोबस्त करण्याचे सांगुनही ते काही ऐकत नव्हते. अखेर नगरपरिषदेने वराह पकडण्याची व त्यांची विल्हेवाट लावण्याची मोहिम सुरू केल्याने वराह मालक खडबडून जागे झाले आहेत. आम्ही आमची डुकरे पकडून नेतो असे नगरपरिषदेस सांगितले आहे.
मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले की. तुम्ही तुमचे वराह पकडून घेऊन जा शहरात एकही वराह दिसता कामा नये. आमची सलग पंधरा दिवस मोहिम सुरू राहणार आहे व शहर वराहमुक्त होणार आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|