मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- महाराष्ट्रातील सत्तेत असणारे मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग करीत असून, त्यांच्यावर दिखाव्यापुरती कारवाई न करता त्यांना मंत्रीपदापासून कार्यमुक्त करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

महाराष्ट्रातील सत्तेत असणारे मंत्री व त्यांचे हस्तक धार्मिक स्थळांचा दुरुपयोग प्रतिबंधक कायदा 1988 चा भंग करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गहिनीनाथ गड या दोन्ही ठिकाणी दोन मंत्र्यांनी मोठ्या संख्येने अनुयायी जमा करून मत गंगोत्री प्रदूषित केली.

या मंत्र्याविरोधात महिलांवर अन्याय, अत्याचार केल्याचा आरोप आहे. अशा मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेण्याची व या मंत्र्यांनी देखील न्यायालयाच्या चौकशीला तोंड देण्याची गरज होती. न्याय मंदिरात निर्दोष असल्याचे सिध्द होणे जनतेला अपेक्षित होते.

मात्र धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव एकत्र करून बडवे-पुजारी यांच्या मदतीने स्वतःला निर्दोष घोषित करण्याचा घाट या मंत्र्यांनी घातला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. कौरव सभेत द्रोपदीचे वस्त्रहरण झाले. सध्या लोकशाहीत अनेक महिलांचे प्राणहरण होत आहे.

अशा वेळी रांझा पाटील प्रवृत्तीच्या मंत्र्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी जनतेला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अशा मंत्र्यांमुळे लोकशाहीची मत गंगोत्री प्रदूषित होत आहे.

त्यामुळे स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर देखील लोकशाही वांझोटी ठरत असून, सर्वसामान्य जनता न्याय, हक्क व विकासापासून वंचित राहत असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|